News Detail

सोनोग्राफी यंत्रात सायलेंट ऑब्झर्व्हर
14 July 2010

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यात कोल्हापूर पॅटर्न 

म. टा. विशेष प्रतिनिधी
       मातेच्या गर्भातील ''ती'' शोधून काढण्याकरिता जर यापुढे सोनोग्राफी सेंटरमध्ये जाऊन गर्भलिंग चिकित्सा करण्याचा कुणी प्रयत्न केला तर, सायलेंट ऑर्ब्झव्हरचे तुमच्यावर बारीक लक्ष आहे हे विसरू नका, असा इशारा राज्य सरकारने मंगळवारी विधान परिषदेत दिला आणि स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधातील आपली मोहीम अधिक तीव्र करीत असल्याचे स्पष्ट संकेत दिले. राज्यातील स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याबाबत मोहन जोशी, जयप्रकाश छाजेड, सुभाष चव्हाण आदी सदस्यांनी प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी सांगितले की, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तेथील सोनोग्राफी सेंटरमधील प्रत्येक यंत्रात सायलेंट ऑर्ब्झव्हर हे डिव्हाईस बसवले आहे. हा कोल्हापूर पटर्न राज्यभरात लागू करण्यात येईल! 

नोंदींची नोंद
       महिन्याभरात सोनोग्राफी मशिनमध्ये कोणकोणत्या तपासण्या करण्यात आल्या याची नोंद हा ऑर्ब्झव्हर करतो. त्यावरून कुठल्या दिवशी, कुणी गर्भलिंग चिकित्सा केली ते स्पष्ट होणार आहे. साहजिकच अशी चिकित्सा करणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे होईल. 

१२५ सेंटरवर 
कारवाई  
        राज्यात ७३७३ रजिस्टर्ड सोनाग्राफी सेंटर असून फ्लाइंग स्क्वाडमार्फत महिन्यातून चार वेळा या सेंटरना भेटी देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी दिली. राज्यातील १२५ सोनोग्राफी सेंटरवर कारवाई झाली असून मुंबईत एकाला तर पुण्यात १५ व्यक्तींना तुरुंगाची हवा खावी लागली आहे.