News Detail

सोनोग्राफी मशीनला सायलेंट ऑब्र्जव्हर बसविण्यावर शिक्कामोर्तब - (लोकमत)
27 August 2011

मुंबई। दि. २६ (प्रतिनिधी)


स्त्रीभ्रूण हत्त्या रोखण्यासाठी सोनोग्राफी मशीनला सायलेंट ऑब्र्जव्हरवर लावणे बंधनकारक करणार्‍या कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांच्या परिपत्रकाला आव्हान देण्यात तथ्य नसल्याचे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने या प्रकरणी दाखल झालेली याचिका आज फेटाळून लावली.
मुख्य न्यायमूर्ती मोहीत शहा यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांचा हा उपक्रम चांगला असून स्त्रीभ्रूण हत्त्येकडे न्यायालय दुर्लक्ष करू शकत नाही. स्त्री व पुरुष प्रमाण संतुलित राहील, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले आहे.
सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भचाचणी करताना लिंग चाचणी करण्याच्या प्रकारात वाढ झाली होती. त्यातून स्त्रीभ्रूण हत्त्या मोठय़ा प्रमाणात केल्या जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. त्यामुळे सोनोग्राफी मशीनला सायलेंट ऑब्र्जव्हरवर लावणे बंधनकारक करणारे परिपत्रक गेल्यावर्षी कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांनी जारी केले.
या मशीनमध्ये कोणत्या व्यक्तीची कशासाठी सोनोग्राफी करण्यात आली, याची नोंद होते. त्याआधारे लिंग चाचणी करणार्‍यावर कारवाई करणे सहज शक्य होते. हे परिपत्रक रद्दबातल ठरवावे, अशी मागणी करणारी याचिका कोल्हापूर येथील एका संघटनेने केली होती. त्यावरील सुनावणीत या यंत्रामुळे स्त्रीभ्रूण हत्त्येचे प्रमाण कमी होईल, असा युक्तिवाद मुख्य सरकारी वकील विजय दिनकरराव पाटील यांनी केला होता.